‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’तील बहाद्दरांना दंडाचा ‘डोस’

अशोक मोराळे/ज्ञानेश्वर फड
पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

शहरात हल्ली दारु पिऊन गाडी चालवणे, सिग्नल तोडणे, झेब्रा क्राॅसींग आेलांडणे यांसह अन्य वाहतूकिच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘वाहतूक सुरक्षा पंधरवाड्या’निमित्त शहरात विविध प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्व पटावे व त्यांनी नियमांचे पालन करावे यासाठी समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे. मात्र तरी देखील अनेक नागरिक सर्रासपने नियमांची पायमल्ली करताना दिसतात.

रविवार (29 एप्रिल) रोजी रात्री 9 ते 1 या कालावधी दरम्यान वाहतूक पोलिसांच्या वतीने ‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’ करणाऱ्या वाहनचालकांना चाप लावण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली होती. यावेळी पोलिसांकडून मोठ्याप्रमाणात मद्यपान करुन गाडी चालविणाऱ्या चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदरची मोहिम शहरातील विविध भागात राबविण्यात आली. या विशेष मोहिमेत 30 अधिकारी व 300 पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी मद्यपान करुन गाडी चालविणाऱ्या 231 दुचाकी गाड्या, 45 चारचाकी गाड्या अशा एकूण 276 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यावेळी स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी नाकाबंदीची मोहीम राबवली होती. तसेच 28 वाहतूक शाखेने ‘ब्रेथ अॅनालायझर मशिन’च्या मदतीने तपासणी केली. यावेळी मद्य प्राशन करुन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती, पुणे शहर वाहतूक शाखा उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली.