बालभारतीचे माजी संचालक वि. वि. चिपळूणकर यांचे निधन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

बालभारतीचे माजी संचालक व जेष्ठ शिक्षणतज्ञ वि. वि. चिपळूणकर यांचे आज, मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. त्यांनी राष्ट्रीय शिक्षण नियोजन प्रशासन संस्थेचे सल्लागार पदी अनेक वर्ष कार्य केले. तसेच, ते राज्याचे शिक्षण संचालक म्हणुन झाले होते. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

विद्याधर विष्णु उपाख्य म्हणजे वि. वि. चिपळूणकर यांचा जन्म १३ एप्रिल १९२९ रोजी विर्ले पार्ले, मुंबई येथे झाला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १० वर्षांच्या (म्हणजेच, १९७६ ते १९८६) कालावधीत राज्याचे शिक्षणसंचालक म्हणून काम पाहिले होते. गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. वि. वि. चिपळूणकर यांनी माध्यमिक शिक्षक, शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षणसंचालक अशा विविध पद भुषवले होते. तसेच बालभारतीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.

‘चिपळूणकर समिती’च्या अहवालामुळे ते अनेकांना माहीत आहेत. सेवानिवृत्तीनंतर ते औरंगाबादला स्थायिक झाले होते. त्यांच्या इतर अनेक योजना आणि त्यांनी केलेली अनेक कामे आजही गौरवाने सांगितली जातात. माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे यांनी सांगितले, की ग्रामीण भागातील बुद्धीमान विद्यार्थ्यांसाठी त्यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या पाठिंब्याने शासकीय विद्यानिकेतनांची संकल्पना साकारली. “उद्धरावा स्वये आत्मा” हे विद्यानिकेतनांचे ब्रीदवाक्य हे त्यांच्याच कल्पनेचे बीज. मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तर सुधीर जोशी शिक्षणमंत्री होते. रात्र शाळा बंद करण्यात याव्या यासाठी अनेकजण पुढे सरसावले असताना, या मसुद्यावर चर्चा करताना चिपळूणकर म्हणाले, “दिवसभर कष्ट करून थकलेले, खिशात थोडा पैसा खुळखुळणारे हे तरुण चैनीसाठी, जुगारात, व्यसनात वाया न घालवता शाळेत येतात हे काय कमी महत्त्वाचे आहे? त्यांनी शाळेच्या परिसरात नुसती एक चक्कर जरी टाकली, तरी त्यांना बोर्डाने सर्टिफिकेट दिले पाहिजे.” त्यामुळेच आजतागत रात्रशाळा सुरू आहेत.

चिपळूणकर हे नवीन सरणीचे शिक्षक होते, त्यांच्या मते, “परीक्षांच्या किळसवाण्या चिखलात रुतलेले शिक्षणाच्या रथाचे चाक बाहेर काढण्यासाठी आपण आटापिटा करायला पाहिजे.” त्याचा श्री गणेश त्यांनी १९७७ मध्ये इयत्ता पहिली आणि दुसरीमध्ये विद्यार्थ्यांना नापास करू नये, असे आदेश शासनाला काढण्यास भाग पाडून केला. पुढे २००१ मध्ये शासनाने ते मागे घेतले.

नायगाव सोबत त्यांच्या विशेष आठवणी आहेत. त्यांनी नायगावला दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती आयोजित करायला ३ जानेवारी १९८२ पासून अनौपचारिकपणे सुरूवात केली. चिपळूणकर सर सेवानिवृत्तीनंतरही १९९६ पर्यंत दरवर्षी ३ जानेवारीला नायगावला जात असत.