Corona Vaccination : कोरोना लशींच्या टंचाईमुळं राज्यात मोफत लसीकरणाचा 1 मेचा ‘मुहूर्त’ तुर्तास टळला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात ठाकरे सरकारने १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. मात्र राज्यात लसीच्या टंचाईमुळे १ मे पासून सुरु होणारे लसीकरण हे आता लांबणीवर पडले आहे. हे मोफत लस आता मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या शेवटी हे लसीकरण सुरू होणार असून, ते पूर्ण होण्यासाठी कमीतकमी ६ महिने लागणार आहे.

आज ठाकरे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रातील १८ वर्षावरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली. राज्यात सुमारे ५.७१ कोटी नागरिकांना मोफत लसीचा लाभ होणार आहे. लस खरेदीसाठी ६ हजार ५०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. तर महाराष्ट्राची सध्याची लस देण्याची क्षमता दरमहा २ कोटी आहे. या वयोगटातील नागरिकांसाठी वेगळी लसीकरण केंद्रे असतील. आता लशीच्या टंचाईमुळे १ मेपासून नागरिकांना लस देणे शक्य होणार नाही. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या अखेरीस हे लसीकरण सुरू होईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

या दरम्यान बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस देण्यासाठी १२ कोटी डोस लागतील. यासाठी आम्ही सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या कंपन्यांशी पत्रव्यवहार केला आहे. या कंपन्यांकडे लशीची मागणी केली आहे. तसेच भारत बायोटेकने राज्याला कोव्हॅक्सिनचे १० लाख डोस देण्याचे मान्य केले आहे. तसेच, सिरमने राज्याला दरमहा १ कोटी डोस देण्याचे तोंडी मान्य केले आहे. तसेच, सध्या देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी २५० रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन २०० रुपयांवर आणली आहे.