निवडणुकाचे वारे ; ‘त्या’ कारमध्ये आढळले १ कोटी ९० लाख

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक पथकाने सुरु केलेल्या तपासणीत बीडहून नगरकडे जाणाऱ्या एका मर्सिडिजमध्ये गोण्यात भरुन पैसे घेऊन जात असल्याचे आढळून आले. हे १ कोटी ९० लाख रुपये कोठे घेऊन जात होते, याचा खुलासा वाहनचालक करु न शकल्याने पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली आहे. हा प्रकार बीड-अहमदनगर रस्त्यावर अंमळनेरपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरवाडी फाट्यावर असलेल्या निवडणूक विभागाच्या चेकपोस्टवर घडला.

याबाबत सविस्तर माहिती, मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास एक मर्सिडिज कार बीडहून नगरकडे जात होती. या गाडीत रोशन विजयराज बंब होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या वतीने विविध रस्त्यावर चेकपोस्ट निर्माण केले असून, याद्वारे येणाऱ्या -जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. ही कार नगरकडे जाताना चेकपोस्टच्या कर्मचाऱ्यांनी अडवली. तपासणी केली असता गाडीत ही रक्कम आढळून आली. १० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यामुळे नियमानुसार जिल्हा आयकर अधिकारी रंगदळ यांना ही माहिती देण्यात आली. औरंगाबादहून आयकर अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले.

घटनास्थळी पाटोदा तहसीलदार रुपा चित्रक, एसडीएम नम्रता चाटे, सपोनि विशाखा धुळे आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी दाखल झाले होते. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे.