यंदाच्या World Cup २०१९ मध्ये ५० षटकात होऊ शकतात ‘एवढ्या’ धावा

लंडन : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणारे फलंदाज आहेतच, त्याचप्रमाणे एका डावात धावांचा डोंगर उभे करणारे संघ देखील आपल्याला पाहायला मिळतात. एकेकाळी ३०० धावांचे लक्ष म्हणजे अशक्यच वाटायचे. मात्र बदलत्या खेळाच्या या जमान्यात ४०० धावा देखील कमी पडू लागल्या आहेत. असाच प्रकार आपल्याला इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत पाहायला मिळाला. दोन्ही संघांनी जवळपास ३५० च्या वर धावा केलेल्या दिसून आल्या. हि मालिका इंग्लंडमध्ये खेळवली जात असल्याने याला महत्व प्राप्त झाल्याचे दिसते. कारण आगामी विश्वकप देखील याच देशात खेळवला जाणार आहे.

त्यामुळे आगामी विश्वचषकात एखाद्या संघाकडून ५०० धावांचा डोंगर उभा राहू शकतो, अशी शक्यता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळातील एका अधिकाऱ्याकडून वर्तवण्यात आली आहे. जर असे झाले तर क्रिकेटप्रेमींना आश्चर्य वाटायला नको. अशी शक्यता वर्तवण्यात आल्याने इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून क्रिकेटप्रेमींसाठी तयार करण्यात येणाऱ्या स्कोअरकार्डमध्ये ५०० धावांसाठीच्या स्कोअरकार्डाचे विशेष डिझाइन करण्यात आले आहे. एक किंवा दोन पाऊंड मध्ये क्रिकेटप्रेमी हे खरेदी करू शकतात. आतापर्यंत आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० धावांसाठीचे स्कोअरकार्ड तयार करण्यात आले आहे. मात्र परिस्थिती पाहता ५०० धावांचे देखील तयार करून ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ४८१ इतकी सर्वाधिक धावसंख्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात उभी राहिली आहे. इंग्लंडमध्ये सध्या सुरु असलेल्या पाकिस्तान आणि इंग्लंडमधल्या मालिकेत देखील इंग्लंडने ३७३ धावांचा डोंगर उभा केला होता, त्याला प्रत्यत्तर देताना पाकिस्तानने देखील ३६१ धाव केल्या होत्या. त्यामुळे या विश्वचषकात ५०० धावा झाल्या तर आश्चर्य वाटायला नको.