राज ठाकरेंना कोहिनूर प्रकरणी ‘ED’ची नोटीस, २२ ऑगस्ट रोजी होणार चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंना चांगलाच धक्का बसून इडी च्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागण्याची शक्यता आहे. कोहिनूर प्रकरणी ईडीने राज ठाकरेंना नोटीस बजावण्यात आले असून २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. कोहिनूर प्रकरणी राज ठाकरे यांच्या संदर्भात काही धागेदोरे सापडल्याने त्यांना आणि उन्मेष जोशी यांना फक्त चौकशीसाठी बोलावले असल्याचे स्पष्टीकरण इडी ने दिले.

हा सरकारचा कट, मनसे स्टाईल आंदोलन करू : मनसे
मनसेकडून आरोप लावला जात आहे की निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना अडकवून ठेवण्यासाठी आणि विरोधकांच्या ईव्हीएमसहित सर्व मुद्द्यांच्या विरोधाची धार कमी करण्यासाठी हे राजकारण खेळले जात आहे. राज ठाकरे आणि मनसे या कारवायांना अजिबात भीक घालत नसून यासंदर्भात राजकारण करून विनाकारण त्रास दिल्यास मनसेने रस्त्यावर उतरून मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. याबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली.

विरोधी पक्षांचा राज ठाकरेंना पाठिंबा :
सरकारचा हेतू विरोध संपविणे नसून विरोधकांना संपविणे हा असल्यामुळे सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. लोकसभा निवडणुकांपासून राज ठाकरेंची सरकारविरोधी भूमिका लक्षात घेता सरकारने इडी चा गैरवापर करत राज ठाकरेंना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबतीत सर्व विरोधक राज ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

राज ठाकरेंनी याप्रकरणात माझा काहीही संबंध नसून याआधी २००८ सालापासून मी या कंपनीतून सर्व शेअर्स विकून या प्रकरणातून बाहेर पडलो असे सांगितले होते. मुंबईतील कोहिनूर मिल क्रमांक ३ खरेदीत राज यांची भूमिका असून, त्यामुळेच ते ईडीच्या निशाण्यावर आहेत. राज यांना या आठवड्यात समन्स बजावण्यात येईल, अशी माहिती ईडीच्या सूत्रांकडून मिळाली असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिले होते.

आरोग्यविषयक वृत्त