NEET Admit Card 2020 : नीट परीक्षेचे प्रवेश पत्र ‘या’ वेबसाईटवर जारी, 3843 केंद्रांवर होणार परीक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी केले आहे. अशात युजी मेडिकल प्रवेश परीक्षेस बसण्यासाठी ज्या १५.९७ लाखाहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती, ते ntaneet.nic.in या वेबसाईटवर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. बरीच ओढाताण झाल्यानंतर हे स्पष्ट झाले की, राष्ट्रीय पात्रता आणि योग्यता चाचणी युजी २०२० निश्चित वेळापत्रकानुसार म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एनटीएने अलीकडेच यासंदर्भात अधिसूचना जारी करत स्पष्ट केले होते की, सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानंतर परीक्षा निश्चित वेळापत्रकानुसार घेण्यात येतील.

एजन्सीने अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे की, ९९ टक्के उमेदवारांना परीक्षा केंद्र शहराची पहिली पसंती मिळेल. यावर्षी एकूण १५.९७ लाख उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. सुरक्षा प्रोटोकॉल राखण्यासाठी नीट २०२० ची परीक्षा केंद्रे दुप्पट करण्यात आली आहेत. त्यानुसार यावेळी ती २५४६ वरुन ३८४३ करण्यात आली आहेत. महामारी दरम्यान यावर्षी परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थी सुरक्षिततेची खबरदारी घेतील.

परीक्षेच्या दिवशी सुरक्षेसाठी एनटीए या नियमांचे करणार पालन
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षेच्या वेळी उमेदवारांमध्ये सामाजिक अंतर लागू करण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवली आहे.
परीक्षा हॉलमध्ये योग्य सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक वर्गातील उमेदवारांची संख्या २४ वरून १२ करण्यात आली आहे. याचा अर्थ आता एका वर्गात केवळ १२ विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील.
परीक्षा हॉलच्या बाहेर सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी केंद्रांच्या बाहेरही पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरुन उमेदवार प्रतीक्षा करताना पुरेसे योग्य अंतर ठेऊन उभे राहू शकतील.
नीट २०२० परीक्षा एका शिफ्टमध्ये म्हणजे दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत घेण्यात येईल. तसेच ही एक पेन आणि पेपर मोड परीक्षा आहे.

परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयांशी संबंधित प्रश्न विचारले जातील. परीक्षेत एकूण १८० प्रश्न असतील. नीट परीक्षा एमसीक्यू मोडमध्ये घेण्यात येईल.