नीरेत भाडेकरुंची माहिती न दिल्याने आठजणांवर गुन्हे दाखल

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाईन – पुरंदर तालुक्यातील नीरा व परिसरातील घरमालकांनी भाडेकरूंची माहिती न दिल्याने आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. नीरा व परिसरात परप्रातींय लोक वास्तव्यास असणाऱ्यांची संख्या वाढत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाने नीरा व परिसरात वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय लोकांची माहिती घेऊन हे लोक ज्या घरमालकांच्या खोलीत रहात आहे. त्या घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांना दिली का नाही हे तपासत होते. त्यावेळी नीरा व परिसरात परप्रांतीय लोक आठ घरमालकांच्या खोलीवर रहात असताना देखील त्यांची माहिती नीरा पोलिस दूरक्षेत्रात दिली नसल्याचे आढळले. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाने आठ घरमालकांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस नाईक संदीप कारंडे करीत आहे.

वास्तविक, घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे क्रमप्राप्त आहे. दरम्यान, नीरा व परिसरात ज्या घरमालकांच्या खोलीत परप्रांतीय राहत असतील त्या घरमालकांनी अद्यापपर्यंत पोलिसांना माहिती दिली नाही त्यांनी तातडीने नीरा पोलिस दूरक्षेत्रात द्यावी असे आवाहन पोलिसांनी केली आहे.