“गडकरींविरोधात मी लढलो तर प्रकाश आंबेडकर उमेदवार देणार नाहीत”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी १० मार्चला लोकसभा निवडणूक २०१९ च्या तारखा जाहीर केल्या. त्यामुळे आता कोणत्या लोकसभा मतदार संघातून कोणता उमेदवार असणार, कोणा विरोधात कोणाचा सामना रंगतदार ठरेल यावर सर्वांच्या नजरा आहेत. शिवाय लोकसभा निवडणुकांमध्ये पुढील पंतप्रधान कोण होणार यावरही सर्वांचे लक्ष आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हटले जातात.

नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदार संघातून लढणार आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी कंबर कसली आहे. मी गडकरींविरोधात नागपुरात निवडणूक लढल्यास प्रकाश आंबेडकर उमेदवार देणार नाहीत. प्रकाश आंबेडकर आणि माझ्यात याबाबत बोलणं झालं आहे. प्रकाश आंबेडकर नागपुरात मतांचं विभाजन होऊ देणार नाहीत, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

दोन दिवसांत काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार. परंतू नागपूरातील स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचा नाना पटोलेंच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यामुळे काँग्रेस नाना पटोलेंना नागपूरातून तिकीट देईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र नानांनी नितीन गडकरींविरोधात निवडणूक लढवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.