ईव्हीएम मशिन सुरक्षित , बॅलेट पेपरचा वापर करणार नाही!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१४ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाने ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा एका आंतरराष्ट्रीय हॅकरने केला. विशेष म्हणजे भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याहत्येमागे देखील ईव्हीएम हॅकिंगच असल्याचा आरोप देखील या हॅकर ने केला आहे. हॅकरच्या या गौप्यस्फोटानंतर एकच खळबळ माजली.

हॅकरच्या या आरोपानंतर पुन्हा एकदा ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह निर्मण झाले आहे. पण यापूर्वीच निवडणूक आयोगाने हा एक प्रकारचा अपप्रचार असल्याचे संगितले होते. त्यानंतर आगामी २०१९ च्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या वापरावर आपण ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणूकांसाठी बॅलेट पेपरचा वापर पुन्हा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘मला हे सर्वांसमोर स्पष्ट करायचे आहे की आम्ही पुन्हा बॅलेट पेपरचा वापर करणार नाही. यापुढेही इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचाच वापर केला जाईल. कोणत्याही राजकीय पक्षांकडून किंवा इतर कोणाच्याही या मशीनबाबत काही तक्रार किंवा शंका असतील तर त्या दूर करण्यास आम्ही तयार आहोत.’ असे सुनील अरोरा यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने मंगळवारी हॅकर सय्यद शुजाविरुद्ध दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. शुजावर एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तसेच सय्यद शुजाच्या पत्रकार परिषदेमागे काँग्रेस होती असा आरोप भाजपने केला आहे.