LokSabha : अशोक चव्हाणांना पेड न्युज प्रकरणी नोटीस

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन- नांदेड लोकसभा मतदार संघातील दोन उमेदवारांना पेड न्यूज प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीस बजावल्या आहेत.  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांच्या संदर्भात वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, विविध चॅनल व सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. याच समितीकडून प्रसार माध्यमांवर नजर ठेवली जात आहे.

उमेदवारांच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या पेड न्यूज असल्याचे लक्षात आल्यानंतर नांदेड लोकसभा मतदार संघातील दोन अपक्ष उमेदवार अशोक चव्हाण व डॉ. महेश तळेगावकर यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीसा बजावल्या आहेत.

डॉ. महेश तळेगावकर यांच्या बाबात दै श्रमिक एकजूट व दै. नांदेड एकजूट या वृत्तपत्रामध्ये ३१ मार्च रोजी बातम्या प्रसिद्ध झाल्या. दै श्रमीक एकजूट या वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर तळेगावकर यांच्या बंडाने भाजप नेते चक्रावले तर दै. नांदेड या वृत्तपात्रात तळेगावकरांची उमेदवारी कायम निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित झाले आहे. तसेच दैनिक पुढारी या दैनिकाने दिनांक 31 मार्च रोजी महाराष्‍ट्र पानावर प्रसिध्‍द केलेल्‍या मराठवाडा रिंगणातील उमेदवार या शीर्षकाखाली नांदेड मतदार संघातील उमेदवारांची नांवे प्रसिध्‍द केली आहेत. त्‍यात अपक्ष उमेदवार अशोक चव्‍हाण यांच्‍या नावापुढे (लोहा) असा उल्‍लेख केल्‍याने त्‍यातून उमेदवाराची वेगळी ओळख प्रदर्शित करण्‍यात आलेली आहे. त्‍यामुळे या दोन्‍ही उमेदवारांना पेडन्‍युजसंदर्भात जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीस बजावली  आहे.