जाणून घ्या, उर्जित पटेलांनि तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्याचे नेमके काय होते मूळ कारण 

 नवी दिल्ली –वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.सरकार आणि त्यांच्यात वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणावरून मतभेद होत असत या  कारणावरून त्यांनी राजीनामा दिला असावा असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच सरकार आणि आरबीआय गव्हर्नर यांच्यात आपसांत वाद झाले होते. त्या वेळी त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा देखील समोर आल्या होत्या. काही काळानंतर सरकार आणि उर्जित पटेल यांच्यातील असलेले वाद मिटले होते. तरीही, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी या निर्णयामागे वैयक्तिक कारणे असल्याचे म्हटले आहे.

हे आहे वादाचे मूळ कारण
आरबीआय आणि केंद्र सरकारमध्ये मागील काही महिन्यांपूर्वी वाद सुरू झाले आहेत. ३ मुद्यांबवरून केंद्र सरकारने आरबीआयवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये अतिरिक्त रिझर्व्ह बँक हा महत्वाचा मुद्दा होता. आरबीआयकडे जवळपास 3.6 लाख कोटींची अतिरिक्त रोख आहे. जमा असलेल्या या रोखीचा वापर विकासकामांसाठी केला जाऊ शकतो असा सरकारचा तर्क लावला होता. परंतु,येणाऱ्या आणीबाणीच्या परिस्थितीचा विचार केल्यास एवढी रोकड   आरबीआयमध्ये नेहमीसाठी  ठेवणे अत्यावश्यक आहे असे बँकेने स्पष्ट केले होते. गेल्या महिन्यात आरबीआयची तशी एक बोर्ड मीटिंग देखील झाली होती . मुंबईत झालेल्या या बैठकीत सरप्लस रिझर्व्ह काढून  25 कोटी रुपयांपर्यंतच्या लघू उद्योग कर्जांसाठी त्याचा उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीनंतर आरबीआय आणि सरकारचा वाद मिटला होता अशी चर्चा देखील उठली होती. परंतु, आता ऐनवेळी उर्जित पटेल यांनी गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला आहे.

यावर नेमके काय म्हणाले उर्जित पटेल?
या प्रकरणावर उर्जित पटेल म्हणाले की, “वैयक्तिक कारणांमुळे मी आपल्या विद्यमान पदाचा तत्काळ राजीनामा देत आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदी काम करण्याची मला संधी मिळाली ही बाब माझ्यासाठी अतिशय सन्मानाची आहे. आरबीआयच्या सहकाऱ्यांनी तेथील स्टाफने  केलेले सहकार्य आणि कठीण परिश्रमाने  आरबीआयने यशाची शिखरे गाठली.आरबीआयमधील सर्वच कर्मचारी,अधिकारी आणि संचालक यांना धन्यवाद  त्यांच्या पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा…”