पुणे शहर व जिल्ह्यात काय चालू आणि काय बंद, जिल्हाधिकार्‍यांनी काढला आदेश, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून शुक्रवारी दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 52 झाली आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व व्यापार बंद ठेवण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली असली तरी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हॉटेल, बिअर बार आणि परमिट रुम बंद करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. मात्र, मद्यविक्रीची दुकाने सुरु होती. त्यामध्ये वाईन शॉप आणि बिअर शॉपी यांचा समावेश होता. या दुकानांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन आता मद्य विक्रीची दुकानेही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व हॉटेल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, महाराष्ट्र पोलीस अधिनियम1951 आणि भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये सध्याला हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज (शुक्रवार) काढलेल्या आदेशानुसार खालील जीवनावश्यक वस्तूंच्या अस्थापना सुरु राहणार आहेत.
1. सर्व हॉटेल/लॉज मध्ये वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्य विषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ बनवून देण्यास परवानगी आहे.
2. सर्व हॉटेल व छोटे व्यावसायिक यांनी खाद्यपदर्थ ऑनलाईन पद्धतीने विक्री करणाऱ्या अस्थापनांच्या मागणीनुसार पार्सल स्वरूपात काऊंटरवरून वितरीत करावे.
3. सर्व हॉटेल व छोटे व्यावसायिक यांनी फोनवरून नागरिकांनी खाद्यपदार्थाची मागणी केल्यास त्यांना खाद्यपदार्थाची होम डिलिव्हरी पार्सल स्वरूपत वितरीत करावे
4.विद्यार्थ्यांसाठी खानावळ तसेच महाविद्यालयातील, वस्तीगृहातील उपहारगृह, मेस सुरु राहतील
5.जीवनावश्यक दुध आणि किराणा दुकाने सुरु राहतील
6. फळे व भाजीपाला मार्केट, फळे व भाजीपाला विक्री दुकाने
7. सर्व औषध उत्पादक व औषध विक्रीची दुकाने सुरु राहतील
8.मटन, चिकन, मासे विक्रीची दुकाने
9. सर्व प्रकारच्या मॉलमधील जीवनावश्यक वस्तू किरणा दुकाने, दुध, फळे व भाजीपाला विक्री दुकाने सुरु राहणार आहेत.