बारामतीप्रमाणेच जामखेडलाही ‘भिलवाडा पॅटर्न’ राबवण्याची राम शिंदेंची मागणी

अहमदनगर :  पोलीसनामा ऑनलाइन  –  जामखेड मध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ११ वर पोहचली आहे. मात्र बारामतीमध्ये कोरोना संसर्गाचा एक रुग्ण सापडल्यानंतर त्या ठिकाणी भिलवाडा पॅटर्न राबवून बारामतीला कोरोना संसर्गापासून मुक्त करण्यात आले. तसेच बारामती प्रमाणे जामखेड मध्ये सुद्धा भिलवाडा पॅटर्न राबविण्यात यावा, अशी मागणी नगरचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केलीय.

एक प्रसिद्धी पत्रक काढून प्रा. राम शिंदे यांनी ही मागणी केली आहे. दरम्यान, या पत्रकात त्यांनी कोणावरही थेट टीका केली नसली तरी त्यांचा रोख कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर असल्याचे दिसून येते. बारामती मध्ये पवार कुटुंबीयांनी जसे लक्ष घातले, तसे जामखेडमध्ये घालावे असं शिंदे यांना अप्रत्यक्षपणे सांगायचे असल्याचं या पत्रकातून स्पष्ट होते. मात्र, जामखेडमध्ये कोरोना संसर्गा बाबत सुरु असलेल्या उपाय योजनांबद्दल शिंदे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु होऊन काल एक महिना पूर्ण झाला. प्रशासनाने केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत ही महामारी नियंत्रणात आणण्यासाठी नगर जिल्ह्यात कसोशीने प्रयत्न केले, रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले. पण जामखेड, नगर शहर, संगमनेर, नेवासा इत्यादी ठिकाणी अधिकचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने ती ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आली आहे. जामखेड वगळता इतर ठिकाणे नियंत्रणात आली. परंतु, काल रात्री जामखेडमध्ये आणखी दोन रुग्णांची वाढ झाली असून, जामखेडमधील एकूण रुग्ण संख्या ११ वर पोहचली आहे. हे ऐकून मला रात्रभर झोप आली नाही. ज्याप्रमाणे बारामतीत एक रुग्ण आढळून आल्यानंतर भिलवाडा पॅटर्न राबवून रुग्णांची संख्या नियंत्रणात आणली. त्याप्रमाणे जामखेड मध्ये देखील भिलवाडा पॅटर्न राबवण्याची नितांत गरज आहे. असं शिंदे यांनी त्या पत्रकात म्हटलं आहे.