राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख दिल्लीला रवाना

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तर राजीनामा देताच देशमुख त्वरित दिल्लीला रवाना झाले आहेत. देशमुख हे सायंकाळी ५ वाजता विमानाने दिल्लीला गेले आहेत.

अनिल देशमुख हे दिल्लीत काही वकिलांशी या प्रकरणी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपावर अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येणार आहे. याप्रकरणावरून अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. तर अखेर देशमुखांच्या राजीनाम्याची वेळ राज्य सरकारवर आल्याने आघाडी सरकारवर नामुष्की ओढवली आहे. या दरम्यान, परमबीरसिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचे आरोप लावले होते. त्यानंतर याप्रकरणावर अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दरम्यान, याचिकेवर सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने CBI ला १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची आता CBI चौकशी होणार आहे. सीबीआयची चौकशी होणार असल्यामुळे या पदावर राहणं योग्य नसल्याचं सांगत अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.