Exit Pollवर विश्वास, नाही ‘ही’ तर ईव्हीएममध्ये फेरफार करण्याची रणनीती : ममता बॅनर्जी

कोलकत्ता : वृत्तसंस्था – सतराव्या लोकसभेचं अखेरचं मतदान संपताच एक्झिट पोल हाती यायला सुरुवात झाली आहे. विविध माध्यम संस्थांनी आणि सर्वेक्षण एजन्सीच्या मदतीने केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या एक्झिट पोलवरच ट्विटरद्वारे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच एक्झिट पोलच्या आकडेवारीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांना केले आहे. या रणनितीचा उपयोग ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यासाठी केला जातो, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे.

एक्झिट पोलवर शंका उपस्थित करत केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटल आहे की, ‘मी एक्झिट पोलच्या चर्चेवर विश्वास ठेवत नाही. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यासाठी ही रणनिती वापरली जाते. मी सर्व विरोधी पक्षांना एकत्रित, बलवान आणि धाडसी होण्यासाठी आवाहन करते. आपण ही लढाई एकत्रित लढू.’

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण ४२ जागा आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार , भाजपाला अंदाजे १२ ते १५ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर तृणमूल काँग्रेसला २३ ते २६ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही तृणमूल काँग्रेसला ४२ पैकी तब्बल ३४ जागांवर दणदणीत विजय मिळाला होता. तर डाव्या पक्षांना दोन , भाजपला दोन तर काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या.