Reliance Jio-Facebook डील बदलणार टेलिकॉम सेक्टरचे ‘चित्र’, जाणून घ्या

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : जगातील मोठी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक आणि रिलायन्स जिओच्या डीलचा थेट परिणाम देशाच्या दूरसंचार क्षेत्रावर होणार आहे. या करारामुळे भारताचे टेलिकॉम क्षेत्र नफ्यात परत येऊ शकेल. त्याचबरोबर, जगभरातील ब्रोकेरेज हाउसने या करारावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओमध्ये 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुकने 9.99 टक्के भाग खरेदी केला आहे. तसेच जिओ प्लॅटफॉर्म, रिलायन्स रिटेल आणि व्हॉट्सअ‍ॅपमध्येही करार होणार आहे. रिलायन्स रिटेलच्या नव्या वाणिज्य व्यवसायात वेग वाढविण्यासाठी हा करार होईल. JioMart प्लॅटफॉर्मवर रिटेल व्यवसाय वाढविण्यासाठी हा करार केला जाईल. यासह लहान व्यवसायांना व्हॉट्सअ‍ॅपवर सपोर्ट मिळणार आहे. छोट्या किराणा व्यवसायांना JioMart सह भागीदारीचा फायदा होईल.

काय होईल परिणाम ?
बिग ब्रोकरेज हाऊस जेफरीजने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, या कराराचे एंटरप्राइझ मूल्य 4.77 लाख कोटी रुपये असेल. तसेच, JIO चा EBITDA दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. या करारामुळे दूरसंचार क्षेत्रात बदल घडू शकतील.

इंडियन इन्फोलाइनच्या अहवालानुसार फेसबुक डील पाहता रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूकदारांना खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरवर इंडिओ इन्फोलाइनने 1710 रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. या करारातून मिळालेला पैसा रिलायन्स इंडस्ट्रीजकडून कर्ज फेडण्यासाठी वापरता येणार असल्याचे इंडिया इन्फोलाइनचे म्हणणे आहे. आरआयएलचे 28000 कोटींचे कर्ज कमी होऊ शकते. त्याचबरोबर आरआयएल-बीपी करारामधून कंपनीला 7,000 कोटी रुपये अधिक मिळतील. त्यामुळे, या कंपनीला मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

आयसीआयसीआय सिक्युरिटीचे म्हणणे आहे की, या कराराचे मूल्यांकन अपेक्षेप्रमाणे आहे. या करारामुळे JIO ला एक मोठा व्यासपीठ बनण्यास मदत होईल. तसेच इक्विरसचे म्हणणे आहे की, हा करार JIO ला बाजारातील आपला हिस्सा वाढविण्यात मदत करेल. या करारामुळे सुमारे 400 कोटींचे कर्ज कमी होईल.

नोमुरा यांनीही हा करार चांगला असल्याचे सांगितले. नोमुराने रिलायन्स इंडस्ट्रीजमधील गुंतवणूकदारांना 1770 रुपयांच्या उद्दिष्टाने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून कर्जाबद्दलची गुंतवणूकदारांची चिंता दूर होईल.