मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उच्च न्यायालयाच्या आदेशाची बनावट प्रत तयार करुन ती वितरीत करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणाची न्यायालयाने गंभीर दखल घेऊन फौजदारी कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आदेशाच्या बनावट प्रतीचा हा प्रकार उघडकीस येताच संबंधित बँक खाती गोठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाने हे प्रकरण मुख्य न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून देण्याचे आदेश महानिबंधक कार्यालयाला दिले आहेत.
याबाबतची माहिती अशी, न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी डिसेंबर २०१९ मध्ये एका प्रकरणात आदेश दिला होता. त्यात दिलेल्या आदेशात बदल करुन आदेशाची बनावट प्रत तयार करण्यात आली आहे. आपल्या बाजूने हा आदेश दिला आहे, हे दाखवण्यासाठी आणि दोन ठेवीदारांचा शोध घेण्यासाठी बनावट आदेशाची प्रत तयार करण्यात आल्याचे या प्रकरणाची तक्रार करणा-या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
या बनावट आदेशाच्या प्रतीमध्ये १ डिसेंबर २०१९ ची तारीख नमूद करण्यात आली आहे. परंतु, १ डिसेंबर रोजी रविवार होता. न्यायमूर्ती पटेल यांनी या बनावट आदेशाच्या प्रतीची पडताळणी केली. त्यानंतर त्यांनी आदेशाची ही प्रत आपली नसल्याचे व ती पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले. आपल्या लिखाणाची पद्धत आणि या बनावट आदेशाचे लिखाण, त्यातील अक्षरांचा आकार यामध्ये तफावत आहे. बनावट कागदपत्रांच्या पद्धतीने ही आदेशाची प्रत तयार केलेली आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.