अपघातात एकाच कुटुंबातील सहा जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –
टेम्पोच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मारूती अल्टो कारने रस्ता दुभाजक तोडून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील
चारजण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

हा अपघात मंगळवारी (दि 15) सकाळी सव्वासहाच्या सुमारास तळेगाव स्टेशन येथील सेवाधाम हाॅस्पिटलजवळ झाला. दुर्गा आशिष गजभिये (31) वर्ष, प्रणय घनश्याम गजभिये (28), आशिष घनश्याम गजभिये (31), दीक्षा घनश्याम गजभिये (26) अशी गंभीर जखमी झाले आहेत. तर घनश्याम गजभिये (60 ) रंजना गजभिये (54 सर्वजण रा. यवतमाळ रोड, बडनेरा, अमरावती) हे दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर सोमाटणे येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजभिये कुटुंबीय मुंबईवरून एक कार्यक्रम उरकून पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाने तळेगाव स्टेशन मार्गे निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला. नागरिकांनी अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी सोमाटणे येथील खासगी रूग्णालयात दाखल केले.