दुर्देवी ! झटक्यात वीज प्रवाह सुरू झाल्याने शॉक लागून पिता-पुत्राचा जागेवरच मृत्यू

लोणार : पोलीसनामा ऑनलाइन  –   तालुक्यातील हिरवड येथील बापलेकाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १७ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली. जनार्धन निवृत्ती मैराळ (वय ५०) व निलेश जनार्धन मैराळ (वय ३५) असं मृत बापलेकाचं नाव आहे.

हिरवड लगत एक धरण असून या धरणातील बॅक वॉटरचा वापर शेतीसाठी या परिसरातील शेतकरी उपयोग करतात. परंतु, उन्हाळा सुरु झाल्याने पाण्याचा धरणातून उपसा होत असल्यामुळे पाणी कमी होत होते. त्यामुळे बॅकवॉटरमधील पाणी देखील कमी झाले होते. परिणामी शेतीला पाणी देण्यात अडचण निर्माण होत असल्याने पहाटेच्या सुमारास हिरवड येथील असलेले जनार्धन आणि त्यांचा मुलगा हे बॅकवॉटरमध्ये टाकलेली मोटार सरकावण्यासाठी धरणावर गेले होते. दोघेजण पाण्यातील मोटर सरकवत असताना अचानक सुरु झालेल्या विद्युत प्रवाहाने दोघांना जबर झटका बसून जागेवरती बापलेकाचा मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण हिरवड गावात वाऱ्यासारखी पसरल्याने गावावरती शोककळा पसरली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल सुरेश काळे, दीपक केसकर यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

भीमा नदी पात्रात आढळला वडील आणि मुलाचा मृतदेह

सोलापुरात पित्याची मुलासह भीमा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सोलापुरातील खासगी दवाखान्यात अकाउंटंट असलेले नागराज सिद्रामप्पा कन्हाळे (रा. भवानीपेठ, घोंगडीवस्ती) त्यांच्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन पेट्रोल आणायला जातो म्हणून शुक्रवारी १५ मे रोजी घरबाहेर गेले असता, ते माघारी न आल्याने त्यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दिली. दोघांचे शनिवारी १६ मे ला कर्नाटकातील धुळखेड परिसरातील भीमा नदीपात्रात मृतदेह आढळले. त्यांनी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली, तेथे ते कसे पोचले याचा पोलीस शोध घेत आहेत.