‘लेकरा’ची आर्त हाक ‘बापा’ला ऐकूच गेली नाही मराठी भाषा दिनी मुलाची कविता अन रात्री शेतकरी पित्याची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शेतात राबणार्‍या पित्याला त्याचा चिमुकला दररोज भरल्या डोळ्यांनी पहात होता. बापाचे कष्ट त्याने शब्दबद्ध केले. मराठी भाषा दिनानिमित्त सकाळी शाळेत त्याने आपली कविता सादर केली. अरे ‘बळीराजा नको करु आत्महत्या’ ही आपली कविता सादर केली. पण लेकाची ही आर्त हाक शेतातील पित्यापर्यंत पोहचलीच नाही. त्याच दिवशी रात्री पित्याने विषप्राशन करुन आत्महत्या केली.

पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे ही ह्दयद्रावक घटना घडली आहे. याबाबतची माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील हनुमाननगर जिल्हा परिषद शाळेत प्रशांत बटुळे हा तिसरीमध्ये शिकतो. त्याने मराठी भाषा दिनानिमित्त आपल्या शाळेत अरे बळीराजा नको करु आत्महत्या ही कविता सादर केली. शेतकर्‍यांनी आत्महत्या करु नये, यासाठी त्याने ही कविता रचली होती.

शेतात कष्ट करुनही तुज्या डोक्याला ताप़़….
अरे बळीराजा नको करु आत्महत्या़…
पैसे नसूनही शाळेत शिकवता लेकरं…..
शेती करुनही तुज्या हाताला फोडं…
अरे बळीराजा नको करु आत्महत्या़…
अशी ही कविता होती.
शाळेत प्रशांतच्या कवितेचे सर्वांनी कौतुक केले. पण, मुलाचे हे आवाहन पित्यापर्यंत पोहचलेच नाही. त्याच रात्री कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याचे वडिल मल्हारी बाबासाहेब बटुळे (वय ३१) यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली.

मल्हारी बटुळे या शेतकर्‍याने ट्रॅक्टर आणि शेतीसाठी बँकेतून कर्ज घेतले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. त्यातून त्यांनी आत्महत्या केली.