भारतीय वैज्ञानिकांना सतावतोय कोरोनाच्या स्ट्रेन D614G चा धोका, मलेशियासोबत काय आहे कनेक्शन ?

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत, तर मलेशियात एका भारतीयामध्ये आढळलेल्या कोरोना व्हाययरसच्या नव्या रूपाने (स्ट्रेन) शास्त्रज्ञांची चिंता वाढवली आहे. भारतातून मलेशियात गेलेल्या एका रेस्टॉरंट मालकाच्या शरीरात स्ट्रेन – डी614जी आढळला आहे. आता भारतीय शास्त्रज्ञ या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, रेस्टॉरंट मालकाच्या शरीरात स्ट्रेन – डी614जी कोरोना व्हायरस आला कुठून. जर हा भारतात राहत असताना आला असेल तर शास्त्रज्ञांची चिंता वाढणे स्वाभाविक आहे. कारण जर याने भारतात आणखी काही लोकांना संक्रमित केले असेल तर शास्त्रज्ञांचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न वाया जाऊ शकतात.

स्ट्रेन – डी614जी कोरोना व्हायरसचे सर्वात भयंकर रूप आहे. जगात पसरलेल्या कोरोना व्हायरसपेक्षा हे दहापट जास्त ताकदवान आहे. अशावेळी जर या व्हायरसने संक्रमित रूग्णांची संख्या वाढली तर शास्त्रज्ञांना या महामारीची लस आणि औषध शोधण्यासाठी पुन्हा नव्याने मेहनत करावी लागणार आहे. मलेशियात ज्या तीन लोकांमध्ये कोविडचा डी614जी सापडला, त्यापैकी एक रेस्टॉरंट मालक सुद्धा आहे, जो भारतातून गेला आहे. आश्चर्यकारक म्हणजे मलेशियाला गेल्यानंतर या भारतीय रेस्टॉरंट मालकाने स्वताला 14 दिवस क्वारंटाइन केले होते. ज्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका आणखी वाढला आहे.

मलेशियाच्या कायद्यानुसार भारतीय रेस्टॉरंटच्या मालकाला पाच महिन्यांसाठी जेलमध्ये पाठवण्यात आले आहे, सोबतच मोठा दंड आकारण्यात आला आहे. अशाच प्रकारे एक अन्य व्यक्ती ज्यामध्ये कोविडचा डी614जी सापडला आहे, तो फिलिपीन्सवरून आला आहे.

अखेर काय आहे डी614जी?
डी614जी त्या प्रोटीनमध्ये सापडते, जे व्हायरसचे ’स्पाइक’ बनवते. हेच स्पाइक आपल्या पेशींमध्ये प्रवेश करून त्यांचे नुकसान करते. हे म्यूटेशन अमीनो अ‍ॅसिडला डी (अस्पार्टिक अ‍ॅसिड) पासून जी (ग्लायसीन), पोझिशन 614 वर बदलते. यासाठी याचे नाव डी614जी ठेवण्यात आले आहे. या स्ट्रेनबाबत पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये समजले होते. युरोपमध्ये आढळलेला अशाप्रकारचा हा पहिला स्ट्रेन आता अनेक देशात सापडत आहे, जो जगासाठी चिंतेचा विषय आहे.