फिरोदिया करंडक आयोजक ‘नरमले’ ! निर्बंध घेतले मागे मात्र, ‘सेन्सॉर’ प्रमाणपत्राची ‘अट’

पुणे पोलीसनामा ऑनलाईन : फिरोदिया करंडक स्पर्धेत आयोध्या, कलम ३७०, ३५ अ, राम जन्मभूमी या विषयावर एकांकिका सादर करुन नये, जर अशा विषयावर एकांकिा सादर झाली तर तिची स्पर्धेत दखल घेतील जाणार नाही, असा निर्बंध यंदा फिरोदिया करंडक स्पर्धा आयोजकांनी घातला होता. त्यावर चौफेर टिका झाल्यानंतर आता आयोजकांनी हे निर्बंध मागे घेतले आहे. मात्र, त्याचवेळी असे विषय सादर करणाऱ्या महाविद्यालयांनी सेन्सॉर प्रमाणपत्र स्पर्धेच्या १० दिवस अगोदर सादर करण्याची अट घातली आहे.

विद्यार्थ्यामधील कला कौशल्य, नृत्य, गायन असा सर्व कला गुणांना वार देणाऱ्या फिरोदिया करंडक एकांकिका महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक आकर्षण आहे. एखादी कथा विविध चित्रकला, नृत्य, गायन, वादन अशा विविध कला गुणांचा आधार घेऊन सादर करण्याची संधी म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. महाविद्यालय स्तरावर अशा प्रकारची ही एकमेव स्पर्धा  आहे.  त्यामुळे केवळ अभिनय नाही तर अन्य कला गुणांमध्ये विशेष रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांची या स्पर्धेचे नेहमीच आकर्षण राहिले आहे.

यंदा या स्पर्धेसाठी आयोजकांनी आयोध्या, रामजन्मभूमी, कलम ३७०, ३५ अ, असे वादग्रस्त विषय घेऊ नये, असे निर्बध घातले होते. त्यातून नाराजीचा सूर सुरु झाला. पुरुषोत्तम, फिरोदिया करंडक स्पर्धेतून पुढे आलेल्या अभिनेते, अभिनेत्री, कलावंत यांनी या निर्बधांना कडाडुन विरोध केला. विद्यार्थ्यांमध्येही नाराजी होती.

विवादात्मक विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले मतप्रर्दशन करायचे नाही तर मग ही स्पर्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवा अशा शब्दात काही जणांनी त्यावर टिका केली. चहुबाजूने झालेल्या टिकेनंतर आता आयोजकांनी हे निर्बंध मागे घेतले आहेत. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून हे निर्बंध घालण्यात आले होते, असे सांगत त्यांनी हे निर्बंध उठविले आहेत. त्याचवेळी अशा विषयांवर एकांकिका सादर करणाऱ्या संघांनी सेन्सॉरकडून प्रमाणपत्र स्पर्धेआधी १० दिवस सादर करण्याचे बंधन घातले आहे. ही अट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जाचक आहे. एका प्रयोगासाठी त्यांना ही कथा सेन्सॉर मंडळाला पाठवून ती मंजूर करु घ्यावी लागणार आहे. म्हणजे निर्बंध उठविले असे दाखविले तरी दुसऱ्या मार्गाने हे निर्बंध तसेच ठेवले गेले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/