नीरेत भंगाराच्या दुकानाला भर दुपारी भीषण आग

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाईन – पुरंदर तालुक्यातील नीरा येथील वार्ड क्रमांक सहामध्ये असलेल्या भंगाराच्या दुकानाला शुक्रवारी (दि.१२) भर दुपारच्या बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे कारण समजू शकले नसले तरी सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीने उग्र रूप धारण केल्यामुळे ज्युबिलंट कंपनीच्या अग्निशमन बंबाने व स्थानिक तरुणांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

नीरा व परिसरात भंगार व्यवसाय करणार्याची संख्या भरपूर प्रमाणत असून हे भंगार व्यावसाईक इलेक्ट्रिक वायर सर्रास जाळत असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी वायू प्रदूषण होत असते. या दुकानदाराकडे आग प्रतिबंध करण्यासाठी कोणतीही साधने नाहीत. त्यामुळे आग लागल्यास ज्युबिलंट कंपनीच्या अग्निशमन बंबाची वाट पहावी लागते . त्यामुळे भंगारच्या दुकानच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून मागील काळात भंगारच्या दुकानाला आग लागलेल्या घटना घडलेल्या आहेत. याकडे मात्र प्रशासन व भंगार व्यावसाईक दुर्लक्ष करीत आहे.

दरम्यान , भंगाराच्या दुकानाला लागलेल्या आग आटोक्यात आणण्यासाठी माजी सरपंच राजेश काकडे यांनी तातडीने ज्युबिलंट कंपनीच्या अग्निशमन बंबाला पाचारण केले .