मटणाच्या वाट्यावरून गावठी कट्टाने मारहाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – धूलीवंदननिमित्त मटणाची पार्टी करण्यासाठी मित्रांनी बोकड आणले. एका मद्यपीने दमदाटी करून मटणात वाटा मागितला. मटन दिल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याने चिडलेल्या मद्यपीने गावठी कट्टा काढत एकाच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी सकाळी आष्टी तालुक्यातील हातवळण येथे ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, हातवऴण येथील महेंद्र शंकर कोरडे आणि त्यांचे मित्र दस्तगीर चँद सय्यद, गोरख निवृत्ती काळोखे आणि इतर मित्रांनी मटणासाठी बोकड आणले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास दस्तगीर यांच्या घराशेजारी या मित्रांनी ते बोकड कापले. त्यानंतर मटणाचे हिस्से करत असताना तिथे जनार्धन बेरड (रा. तरडगव्हाण, जि. अहमदनगर) हा मद्यपी मटन घेण्यासाठी आला. सध्या मटन वाटपाची यादी तयार झाली असून उरले तर तुला देऊन असे सांगताच जनार्धनने आरडाओरडा करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोरडे आणि त्यांच्या मित्रांनी जनार्धनला एक किलो मटन दिले आणि बदल्यात साडेचारशे रुपये मागितले. याचा राग आल्याने जनार्धनने स्वतः जवळील गावठी कट्टा काढला आणि कोरडे यांच्या डोक्यात मारला. यावेळी त्या कट्ट्यातून एक गोळी देखील खाली पडली. कट्टा जोरात लागल्याने कोरडे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यानंतर कोरडे यांच्या मित्रांनी मध्यस्थी करत जनार्धनला रोखले आणि मारहाण करत पिटाळून लावले.

याप्रकरणी कोरडे यांच्या फिर्यादीवरून जनार्धन बेरड याच्याविरुद्ध अंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.