‘राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी हिंदू महासभेचे शहर उपाध्यक्ष सुधाकर बहिरवाडे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी भारतमातेचे आक्षेपार्ह व्यंगचित्र काढून देशाचा अपमान केला आहे असं त्यांचं म्हणंणं आहे. सुधाकर बहिरवाडे यांनी याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.

राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त व्यंगचित्र काढले आणि ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर प्रसिद्ध केले आहे. सदर व्यंगचित्र भारतमातेचे असून या व्यंगचित्रात भारतमातेला पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दोरीने फाशी देत आहेत. सदर व्यंगचित्राने भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. राज ठाकरे यांनी भारत मातेचा सरळ सरळ अपमान केला असून, संपूर्ण भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्या या कृत्यासाठी राज ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी तक्रारी अर्जातून केली आहे.

राज यांनी यापूर्वीही भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत : बहिरवाडे

“व्यंगचित्र काढून भावना दुखावण्याची राज ठाकरेंची ही काही पहिलीच वेळ नाही. राज ठाकरे यांनी यापूर्वीही अनेकवेळा अशी व्यंगचित्रे काढून भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. गणपती, श्री राम यांचेही व्यंगचित्र काढून राज ठाकरे यांनी नाराजी ओढवून घेतली होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत मातेचे व्यंगचित्र काढल्याने आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत. राजकीय विषयावर त्यांनी काही करावे, काही गोष्टींमध्ये आम्हीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध केला आहे” असे बहिरवाडे म्हणाले.

या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करू : पोलीस निरीक्षक

“राज ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी याची चौकशी करून गुन्हा दाखल करून घेण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना भेटून सोलापुरात गुन्हा दाखल करून जिथे व्यंगचित्र काढले आहे, तिथे वर्ग करण्यात यावा अशी मागणी हिंदू महासभेच्या वतीने केली जाणार आहे” असे सुधाकर बहिरवाडे यांनी सांगितले.

शिवसेनेचा पाठिंबा…

भारत मातेला फाशी देणारे व्यंगचित्र काढल्याप्रकरणी हिंदू महासभेच्या निषेधाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी पाठिंबा दिला आहे. ते आमच्या सोबत असल्याची माहिती सुधाकर बहिरवाडे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली.