लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा, उपसभापती शिवा सुरासेंचं आरोग्य मंत्र्यांना पत्र

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात (पी.एम) उत्तरीय तपासणी कक्ष, एक्स-रे टेक्निशियन तसेच आरोग्य कर्मचारी या सारखी विविध रिक्त पदे भरण्याबाबत तसेच खडक माळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याबाबत निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवा सुरासे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्रव्यवहार द्वारे निवेदन देऊन मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथील सुसज्ज अश्या ग्रामीण रुग्णालयात दोनशेच्या आसपास गावांमधून रुग्ण तपासणी साठी येतात, शिवाय या परिसरात अपघाताचे प्रमाण जास्त असल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीची उत्तरीय तपासणी कक्ष नसल्याने त्या मृतदेहाची हेळसांड होते. तसेच या ग्रामीण रुग्णालयात एक्स-रे टेक्निशियन नसल्याने रुग्णांची मोठया प्रमाणात हेळसांड होत आहे. तसेच खडकमाळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवकांच्या रिक्त जागा असून त्या भरण्याबाबत राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी आपल्या स्तरावरून तातडीने आदेश द्यावेत. तसेच लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयासाठी उत्तरीय तपासणी केंद्रासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती शिवा सुरासे यांनी केली आहे.

लासलगाव सारख्या ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी येथील ग्रामीण रुग्णालय केंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र येथे अनेक पदे रिक्त असल्यामुळे रुग्णसेवेवर अप्रत्यक्षरित्या त्याचा परिणाम होत आहे. परिणामी येथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांना अविरत कर्तव्य बजावावे लागत आहे. या परिस्थितीचा विचार करून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तातडीने या संदर्भात आदेश करावे, अशी जोरदार मागणी उपसभापती शिवा सुरासे यांनी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –