बारामती : अपहरणकर्त्याच्या तावडीतून मुलाची सुटका, 5 कोटीची खंडणी मागणारे आरोपी गजाआड

बारामतीः पोलीसनामा ऑनलाईन- बारामतीत येथील एका बागायतदार शेतक-याच्या मुलाचे अपहरण करून तब्बल 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या आरोपींच्या अवघ्या 24 तासाच्या आत बारामती शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

कृष्णराज धनाजी जाचक असे अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी पृथ्वीराज नामदेव चव्हाण यांनी बारामती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बारामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील बागायतदार धनाजी जाचक यांचा मुलगा कृष्णराज जाचक आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोघेही शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मोटारीतूून घराकडे निघाले होते. त्यावेळी वाटेत जळोची रोड येथे एका कारमधून आलेल्या 4 अज्ञात आरोपींनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण करून कृष्णराजला आरोपींनी गाडीत घालून पसार झाले. तसेच जाताना आमच्या फोनची वाट पाहा, असे फिर्य़ादीला सांगितले. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास मुलगा कृष्णराजच्या मोबाईलवरून आरोपीनी धनाजी जाचक यांना फोन केला. आपण एका तासात 5 कोटी रुपये द्या, नाहीतर आपल्या मुलाला मुकाल, अशी धमकी दिली. या फोनमुळे जाचक यांना धक्काच बसला. एकुलता एक मुलगा आणि आता एवढी मोठी रक्कम एका तासाच्या आत आणायची कोठून? असा प्रश्न त्यांना पडला. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी बारामती शहर पोलीसात फिर्य़ाद दिल्यानंतर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी मोबाईल टॉवरचे लोकेशन घेऊन मुलाचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली. ज्या ठिकाणाहून अपहरण केले होते. त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही तपासून आरोपींचा माग काढला अन् आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या तावडीतून कृष्णराजची सुटका करण्यात आली.