Pune News : नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण

राजगुरुनगर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पारनेर तालुक्यातील निघोज गावातील दोन नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे शास्त्राचा धाक दाखवून फिल्मी स्टाईलने अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना राजगुरुनगर येथील खेड घाटात रविवारी (दि.7) दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिगंबर भागाजी लाळगे, गणेश दत्तू कवाद असे अपहरण झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे आहेत. याप्रकरणी विठ्ठल भाऊसाहेब कवाद (रा. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पारनेर तालुक्यातील निघोज गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राजकिय सहलीसाठी गेले होते. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास जेवणासाठी खेड घाटाच्या वरती माळेगाव येथील पुणे-नाशिक महामार्गालगत हॉटेल सुर्यकांता येथे जेवणासाठी थांबले होते. त्यावेळी दोन सदस्यांचे अपहरण करण्या आले.

मिळालेल्या माहितीनुसार, निघोज गावातील नविर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राजकीय सहलीसाठी गेले होते. जेवणासाठी थांबवल्यानंतर सदस्य आणि काही गावकरी ओतूर येथे देवदर्शनासाठी जात होते. त्यावेळी सचिन मच्छिंद्र वराळ, मंगेश सखाराम वराळ, सुनिल मच्छिंद्र वराळ, निलेश राजु घोडे, अजय संजय वराळ, राहुल भाऊसाहेब वराळ, स्वप्निल भाऊसाहेब दुनगुले, सुबाष आनंदा वराळ, आकाश विजय वराळ, धोंडीभाऊ जाधव (सर्व रा. निघोज, ता. पारनेर) यांच्यासह 15 ते 20 जणांनी ग्रामपंचायत सरपंचपदाच्या कारणावरुन फिर्यादी विठ्ठल कवाद यांना काठीने मारहाण केली.

आरोपींनी कवाद यांना शिवीगाळ करुन व धमकी देऊन तलवारीची व लोखंडी रॉडचा धाक दाखवून दिगंबर लाळगे आणि गणेश कवाद या दोन नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना बळजबरीने स्कॉर्पिओ गाडीत घातले. तसेच फिर्यादी यांचा मोबाइल हिसकावून घेऊन तो आपटून फोडून दोन सदस्यांना घेऊन ते निघून गेले. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात निघोज गावातील 25 गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.