जाणून घ्या केव्हापासून सुरू होणार कॉलेजचं नवीन सत्र, इथं वाचा डिटेल्स

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात यंदा लांबणार आहे. सरकारकडून नियुक्त केलेल्या समितीने शिफारस केली आहे की, उच्च शैक्षणिक वर्ष २०२०-२१ जुलैच्या मध्यापासून सुरू व्हायचे, ते आता सप्टेंबरपर्यंत स्थगित केले गेले आहे.

जेव्हा देशात कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला होता तेव्हा केंद्र सरकारच्या आदेशानुसार विद्यापीठं आणि शाळांना १६ मार्चपासून बंद केले गेले होते.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) परीक्षा संबंधित मुद्द्यांविषयी, शाळा महाविद्यालये बंद आणि शैक्षणिक कॅलेंडरबाबत चर्चा करण्यासाठी सात सदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीने शुक्रवारी आपला अहवाल सादर केला होता. नवीन शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीला दोन महिन्यांच्या विलंबाशिवाय पॅनेलने जुलै महिन्यातील परीक्षा न घेण्याची देखील शिफारस केली आहे.

युजीसी विद्यापीठाच्या परीक्षांबाबत समितीच्या मार्गदर्शक सूचना व अहवालाच्या आधारे शैक्षणिक कॅलेंडर तयार करणार आहे. ज्या गाइडलाइन परीक्षेसाठी बनवल्या जातील त्यात उच्च शिक्षण संस्थांना अडथळा येणार नाही. संस्थांना नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करता यावे यासाठी लवकरच एक मुदतवाढ निश्चित केली जाईल.

सात सदस्यीय समितीची शिफारस जर युजीसीने मान्य केली तर याचा अर्थ असा की मेडिकल प्रोग्रॅम आणि टेक्निकल प्रोफेशनल अभ्यासक्रमांची अंतिम तारीख अनुक्रमे ३१ आणि १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यासाठी केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. कारण या अभ्यासक्रमांच्या तारखेमध्ये बदल करणे किंवा तारखांमध्ये छेडछाड करणे यासाठी कोर्टाची परवानगी आवश्यक आहे.