शिवसेना कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी माजी उपमहापौर डब्बु असवाणी विरुद्ध FIR

पुणे /पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना कार्यकर्त्याला अडवून बेदम मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर डब्बू हिरानंद असवाणी यांच्यासह चार जणांविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आज दुपारी पिंपरी कॅम्प परिसरातील आसवाणी यांच्या घराजवळ झाला. या घटनेत तीनजण जखमी झाले आहेत.

याप्रकरणी अभिनवकुमार सुरेंद्रकुमार सिंग यांनी फिर्याद दिली आहे. तर या घटनेत फिर्यादी सिंग, अनिल विनोद पारचा, उमाशंकर दुर्जन राजभर हे जखमी झाले आहेत. पिंपरी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी हे शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांचे जावई बबलु सोनकर यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करतात. आज मतदान असल्याने बबलु सोनकर आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारसंघात फिरत होते.

दुपारी बाराच्या सुमरास ते डब्बू आसवाणी यांच्या घरासमोर आले असता डब्बू आसवाणी यांनी बबलु सोनकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आडवले. तसेच कार्य़कर्ते अनिल पारचा, उमाशंकर राजभर यांना लाकडी बांबु व सिमेंट गट्टुने मारहाण करून जखमी केले. दरम्यान, या घटनेनंतर पिंपरी कॅम्प परिसरात तणावाचे वातावरण झाले. पोलिसांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा बंदोबस्त ठेवला होता. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Visit  :Policenama.com