बीडमध्ये चाईल्ड ‘पॉर्नोग्राफी’चा प्रकार उघड ! परळी, गेवराईतून व्हिडीओ अपलोड झाल्यानं FIR दाखल

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीड जिल्ह्यात चाईल्ड पॉर्नोग्राफी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात दोन लहान मुलांचे व्हिडीओ एका वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. हा सगळा धक्कादायक प्रकार मुंबई सायबर क्राईमच्या निदर्शनास आला असून तपास केल्यानंतर हे व्हिडीओ बीडमधून अपलोड झाल्याची माहिती सायबर क्राईम सेलने बीड पोलिसांना कळवली. यानंतर परळी, गेवराईमध्ये या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणासंबंधी पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरु केली आहे. तसेच यामागे अजून दुसरं कुठलं रॅकेट आहे का याचा देखील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. लवकर या प्रकरणाचा बिमोड करण्यात येईल असे ही स्पष्ट करण्यात आले.

तसेच पूर्ण राज्यभरातून या संबंधित एकूण २७ व्हिडिओंवर मुंबई डीजी कार्यालयांतर्गत चालणाऱ्या सायबर सेलकडून कारवाई करण्यात येणार आहे. या २७ व्हिडिओंपैकी बीड जिल्ह्यातून दोन व्हिडीओ अपलोड झाल्याचे पोलिसांना समजले आहे. त्यापैकी १ व्हिडीओ हा परळीतून तर दुसरा व्हिडीओ हा गेवराईतून अपलोड झाल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान हे व्हिडीओ बीडमध्ये तयार करण्यात आले की नाही याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र पोलिसांनी अशी शक्यता वर्तविली आहे की व्हिडीओ पॉर्न साईट्सवरुन डाऊनलोड करुन मग सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमधील पीडित मुलं ही बीड जिल्ह्याच्या बाहेरील असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणारी व्यक्ती मात्र बीड जिल्ह्यातील आहे की मग बाहेरील कुणी याबाबत साशंकता आहे. तसेच या मागे एखादे रॅकेट देखील असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

बाल लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ फेसबुकवर तसेच इतर अनेक सोशल मीडिया साईट्सवर व्हायरल झाल्याने दिल्लीच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने महाराष्ट्राचे सायबर क्राईमचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच त्यांना १८ डिसेंबर २०१९ रोजी कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. तसेच राज्यातील सर्वच सायबर क्राईम पोलीस ठाण्यांना गुन्हे दाखल करण्यासंबंधीत आदेश देण्यात आले होते.

फेसबुक पेज लाईक करा –