विरारमध्ये अग्नीतांडव ! AC ठरला 13 रुग्णांच्या मृत्यूचं कारण; आग लागताच कर्मचारी गेले पळून, डॉक्टरही नसल्याचा नातेवाईकांचा आरोप

विरार : पोलीसनामा ऑनलाइन – विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आयसीयुला पहाटे ३ वाजता लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यु झाला. एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्याहून अधिक गंभीर बाब समोर आली असून आग लागताच तेथे असणारे कर्मचारी पळून गेले असून त्यावेळी आयसीयुमध्ये एकही डॉक्टर नसल्याचा आरोपी रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे़. या आगीतील मृत्युमध्ये ५ महिला व ६ पुरुष असून ६ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे़ आगीतून वाचलेल्या ४ रुग्णांपैकी २ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

रुग्णालयातील एसीचा स्फोट झाल्याने २ मिनिटातच संपूर्ण आयसीयुमध्ये धूर पसरला. त्यामुळे आतील लोकांना काहीच दिसत नव्हते. आगही भडकली होती़ त्यामुळे दरवाजाजवळील ४ रुग्णांना बाहेर काढता आले. तोपर्यंत आग इतकी भडकली होती की, कोणाला आत जाणे शक्य झाले नाही. आगीत १३ रुग्णांना होरपळून मरताना पाहण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. या घटनेत संपूर्ण आयसीयु जळून खाक झाले आहे.

या रुग्णालयात आणखी ९० रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. ते सर्व व्यवस्थित आहेत.
आग लागली असल्याचे दिसून येताच तेथील कर्मचारी पळून गेले. याशिवाय या आयसीयुमध्ये कोणीही डॉक्टर नव्हते. या रुग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शाह यांनी डॉक्टर नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या आगीला जबाबदार असणार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेले आरोप गंभीर असून त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्यांचे जबाब नोंदवून घेणार असे पोलिस अधिकार्‍यानी सांगितले. या आगीबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.