‘जामिया’जवळ तिसर्‍यांदा ‘फायरिंग’, FIR दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री उशिरा विद्यापीठाच्या गेट क्रमांक 5 जवळ काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आहे.

विद्यापीठाच्या गेटवर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्यांनतर आरोपी पळून जाण्यास यशस्वी ठरले आहेत. हल्लेखोर लाल रंगाच्या स्कुटीवरून आले होते, ज्यातील एकाने लाल रंगाचे जॅकेट घातले होते, यासंबंधित माहिती जामिया कॉर्डिनेशन कमिटी (जेसीसी)ने दिली. दरम्यान, या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. मात्र, गोळीबार झाल्याचे समजताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 27 (शस्त्रे वापरण्याच्या शिक्षे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सीएए आणि एनआरसी विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापाठीत निदर्शने सुरू असून गेल्या चार दिवसात विद्यापीठ परिसरात गोळीबार झाल्याची ही तिसरी घटना आहे. पहिल्यांदा गुरुवारी रामभक्त गोपाल या व्यक्तीने आंदोलकांवर गोळीबार केला होता. ज्यात एक विद्यार्थी जखमी झाला होता. विशेष म्हणजे, गोळीबार करण्याच्या आधी त्यांने फेसबुक लाईव्ह केले होते. तर, शनिवारी शाहीन बाग परिसरात कपिल गुर्जर नावाच्या व्यक्तीने गोळीबार केला होता. कपिल गुर्जरने आंदोलन स्थळापासून काही अंतरावर हवेत गोळीबार केला होता.