विधानसभा 2019 : काँग्रेसची 50 जणांची यादी तयार, ‘या’ दिवशी होणार जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यातील पाच उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसने देखील 50 उमेदवारांची यादी तयार केली आहे. उमेदवारांची यादी 20 सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप पूर्ण झाले आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 125 जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. तर उर्वरीत 38 जागा मित्र पक्षांना सोडण्यात आल्या आहेत.

काँग्रेसच्या छाननी समितीची दिल्लीतील काँग्रेस वॉर रुममध्ये आज बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीमध्ये 50 ते 60 उमेदवारांच्या नावांवरती अंतीम निर्णय घेण्यात आला. त्यापैकी 50 जणांची यादी तयार करण्यात आली असून ती शुक्रवारी (दि.20) जाहीर करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत कमी नुकसान व्हावे यासाठी काँग्रेसने ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ला सुरुवात केली आहे. त्यासाठी दिल्लीमध्ये एक खास योजना आखण्यात आली असून राज्यातील दिग्गज नेत्यांना विधानसभा निवडणुका लढवण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींनी दिले असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. जे नेते कधी विधानसभा निवडणूक लढले नाहीत त्यांनाही मैदानात उतरविण्याचा काँग्रेसचा विचार आहे. मात्र हे नेते हा आदेश ऐकणार का हाच खरा प्रश्न आहे.

Visit – policenama.com