80 दिवसानंतर पहिल्यांदाच संपुर्ण देशात ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या मागणीत वाढत होत आहे. त्याचवेळी क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 40 डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. यामुळे आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ  किंमतीत प्रति लिटर 60 -60 पैसे वाढ करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान गेल्या 80 दिवसात तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या अधारभूत किंमतीत वाढ केली नव्हती. मागील वेळी 16 मार्चला इंधनाच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती.

लॉकडाऊन दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील चढ-उतारांवर राज्य सरकार जबाबदार आहे. खरं तर राज्यांच्या महसूल वाढवण्यासाठी फक्त व्हॅट किंवा सेस वाढवल्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती. लॉकडाऊन दरम्यान रोखीच्या संकटाचा सामना करत असलेल्या बहुतेक राज्य सरकारांनी इंधनावर कर लावून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या.

मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये आणि डिझेलवर 13 रुपये प्रतिलटर वाढ केली. यानंतरही दोन्ही इंधनाच्या किरकोळ किंमतीत कोणताही बदल झाला नाही. वास्तविक, उत्पादन शुल्कात झालेली वाढ कच्चा तेलाच्या कमी किमंतींसह समायोजित केली गेली. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये बदल हा कच्चा तेलाच्या किंमतीवर ठरवला जातो. भारतात 80 टक्के क्रूड तेल आयात केले जाते.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाची किंमत बॅरलच्या तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहचली आहे. एप्रिलमध्ये कच्चे तेल प्रति बॅरल 30 डॉलरच्या खाली गेले. अजूनही कच्चा तेलाच्या किंमती 2019 च्या अखेरच्या वेळेपेक्षा कमी आहेत. एप्रिलमध्ये पेट्रोल आणि डिझेलची मागणी निम्म्यावर आली. प्रत्यक्षात लॉकडाऊनमुळे अनेक कारखाने व कार्यालये बंद होते. त्याचवेळी लोकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध घातल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती. त्यामुळे एप्रिलमध्ये पेट्रोल – डिझेलच्या मागणीत निम्म्याने घट झाली.

इंडिय ऑईलच्या म्हणण्यानुसार, एप्रील 2020 मध्ये पेट्रोलियम उत्पादनांची मागणी 46 टक्क्यांनी घटली. एप्रिल 2019 च्या तुलनेत या काळात पेट्रोल 61 टक्के, डिझेल 56.7 टक्के आणि एटीएफच्या विक्रित 91.5 टक्क्यांनी घट झाली. गेल्या महिन्यात सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्याने मे महिन्यात एप्रिलच्या तुलनेत पेट्रोलियम उत्पादनांची मागणी सुधारली. मात्र, मे 2019 च्या तुलनेत पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनाची मागणी 38.9 टक्क्यांनी कमी झाली आहे. 8 एप्रिलपासून देशातील मॉल आणि बाजार पुन्हा सुरु होत असल्याने इंधनाच्या मागणीत वाढ होईल.

देशाच्या राजधानी पेक्षा गुरुग्राम मधील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी आहेत. आज दिल्लीत पेट्रोलची किंमत 71.86 तर डिझेल 69.99 रुपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर राजधानीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये पेट्रोल 71.68 तर डिझेल 63.65 रुपये प्रति लिटर विक्री होत आहे. मुंबईत पेट्रोल 78.91 रुपये आणि डिझेल 68.79 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 76.07 आणि डिझेल 68.74 रुपये प्रति लिटर विकले जात आहे.