आंबेगाव तालुक्यात ‘कोरोना’चा पहिला बळी, 64 वर्षीय व्यक्तीचा YCMH मध्ये मृत्यू

आंबेगाव/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना कोरोना विषाणूने आता ग्रामीण भागात देखील शिरकाव केला आहे. आंबेगाव तालुक्यातील नारोडी येथील 64 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा आज (शनिवार) पिंपरी येथील वायसीएमएच रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आंबेगाव तालुक्यातील कोरोनाचा पहिला बळी गेल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. आशेचा किरण म्हणून तालुक्यातील 43 पैकी 10 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नारोडी येथील 64 वर्षीय व्यक्ती मुंबई येथील घाटकोपर येथून 21 मे रोजी आठ जणांच्या कुटुंबासह आले होते. 31 मे रोजी त्यांना घशाचा त्रास सुरु झाला. त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात आलेल्या घरातील 8 जणांचा आणि दोन शेजारी अशा दहा जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा अहवाल सोमवारी येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आंबेगाव तालुक्यातील आतापर्यंत 43 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. त्यातील 10 जण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी यातील 4 रुग्ण घरी परतले आहेत. त्यातील एकाचा आज (शनिवार) रोजी मृत्यू झाला आहे. सध्या 32 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, घोडेगाव व पिंगळवाडी या दोन गावातील रुग्ण घरी परतल्याने ही दोन गावे कोरोनामुक्त झाले आहेत.