लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी ‘या’ नामांकित ब्रॅण्डच्या टूथपेस्टवर कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोलगेट आणि सेन्सोडाईन ब्रॅण्डच्या टूथपेस्टवर अन्न व औषध विभागाने कारवाई करत सुमारे साडेचार कोटींचा माल जप्त केला आहे. वैद्यकीय दावा करून लोकांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

या कारणामुळे केली कारवाई –

टूथपेस्टला औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायद्याअंतर्गत ‘सौंदर्यप्रसाधने’ या वर्गाखाली परवाना दिला जातो. टूथपेस्टना वैद्यकीय प्रमाणित किंवा संवेदनशील दातांसाठी सुरक्षित असा दावा करण्याची कायद्याने परवानगी नाही. डॉक्टरांकडून दिल्या जाणाऱ्या काही विशिष्ट टूथपेस्टना ‘औषधे’ म्हणून प्रमाणित केले जाते. त्यांनाचा असा दावा करण्याची परवानगी आहे. मात्र असे असताना देखील कोलगेट आणि सेन्सोडाईन ब्रॅण्डच्या टूथपेस्टवर संवेदनशील दातांसाठी चोवीस तास संरक्षण, वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित असे वैद्यकीय दावे केले आहेत. या कारणाखाली अन्न व औषध विभागाने कोलगेट आणि सेन्सोडाईन ब्रॅण्डच्या टूथपेस्टवर ठाणे विभागामध्ये कारवाई केली आहे.

ठाणे, कोकण विभागाचे सहआयुक्त विराज पौनिकर यांनी दिलेल्या माहितीनुसार , ‘सौंदर्यप्रसाधने म्हणून परवानगी दिलेली असताना वैद्यकीय दावे करणे कायद्याचे उल्लंघन आहे. त्याबद्दल दोन्ही कंपन्यांना नोटीस पाठवली मात्र त्यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच न्यायालयामध्ये हे प्रकरण लवकरच दाखल करण्यात येईल.