मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्हा आज बंद

पोलिसनामा ऑनलाईन – मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय न आल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. आज सोलापुरात मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाले असून आंदोलनाची पहिली ठिणगी माढ्यात पडली आहे.

माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे साडेपाच वाजताच टायर पेटवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतरचा मराठा संघटनांनी पुकारलेला राज्यातील हा पहिलाच बंद आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माढ्यातील तरुणांनी भल्या पहाटेच एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी माढा शहर दणाणून सोडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे आंदोलन करत राज्य सरकारचे प्रतिकात्मक श्राद्ध घातले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.