मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मौजमजेसाठी शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या तिघांना भारती विद्याापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ५ लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

जीवन बाजीराव खेडेकर (वय २१) आणि अनुज रोहिदास भंडलकर (वय १९, दोघे मूळ रा. गुऱ्होळी, ता. पुरंदर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सिंहगड रस्ता, भारती विद्याापीठ, बिबवेवाडी परिसरातून दुचाकी चोरीला गेल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपास भारती विद्यापीठ पोलीस करत होते. त्यावेळी कात्रज येथील पुलाजवळ दोन संशयित चोरटे थांबले आहेत. त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस हवालदार प्रदीप गुरव आणि प्रणव सकपाळ यांना मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीत खेडेकर आणि भंडलकर यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर केलेल्या चौकशीत त्यांनी पुणे शहर तसेच सासवड परिसरातून मौजमजेसाठी दुचाकी चोरल्याचे सांगितले. दोघांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरल्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून तेरा दुचाकी जप्त करण्यात आल्या.

ही कारवाई पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त व्ही. पी. नांदेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील, विनोद भंडलकर, गणेश सुतार, उज्वल मोकाशी, जगदीश गायकवाड आदींनी ही कारवाई केली