ABVP च्या माजी नेत्यानं ‘नोट’वर महात्मा गांधी ऐवजी लावला ‘नथुराम गोडसे’चा फोटो, जाणून घ्या पुढं काय झालं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील एका व्यक्तीवर आरोप आहे की त्याने 10 रुपयांच्या नोटवर महात्मा गांधींच्या जागी नथुराम गोडसेचा फोटो लावला. एनएसयूआय ने शिवम शुक्ला नावाच्या या व्यक्तीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) चा सदस्य सांगत एमपी पोलिसात तक्रार दिली आहे. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील शिवम शुक्ला याच्यावर आरोप करण्यात आला आहे की त्याने 10 रुपयांच्या नोटवरील महात्मा गांधींचा फोटो बदलून त्याजागी नथुराम गोडसेचा फोटो लावला आणि त्यास फेसबुकवर शेअर केले.

एबीव्हीपीने या प्रकरणात काय म्हटले ?
या प्रकरणानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, एबीव्हीपीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की आरोपी व्यक्ती दोन वर्षाहून अधिक काळापासून संघटनेत नाही. त्याने जे केले ते निंदनीय आहे, याचा आम्ही विरोध करतो. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत आणि त्यांच्याबद्दल आमची श्रद्धा अतूट आहे. एबीव्हीपीचे राष्ट्रीय माध्यम संयोजक राहुल चौधरी म्हणाले की, आरोपी शिवम शुक्ला यास 2017 मध्येच संघटनेतून हद्दपार केले गेले आहे. यापूर्वी त्याने संस्थेच्या नावाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला होता.

संपूर्ण प्रकरण काय आहे ?
खरं तर, 19 मे रोजी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे यांच्या 111 व्या जयंतीनिमित्त स्वत:ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सचिव म्हणून वर्णन करणारे सिधी जिल्ह्यातील शिवम शुक्ला यांनी ‘लाँग लाइव्ह नथुराम गोडसे’ या शीर्षकासह 10 रुपयांच्या एका नोटचा फोटो शेअर केला ज्यात महात्मा गांधींच्या जागी गोडसे यांचा फोटो होता. गोडसे नायक असल्याचे वर्णन करत त्या व्यक्तीने ही पोस्ट फेसबुकवर शेअर केली.

शिवम शुक्ला यांनी सोशल मीडियावर ही गोष्ट लिहिली
शिवम शुक्ला यांनी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये पुढे लिहिले आहे, ‘रघुपती राघव राजा राम, नथुरामांनी देश वाचवला, अमर महात्मा पूज्य पंडित श्री नथुराम गोडसे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन, नथुराम गोडसे अमर रहा.’ शिवम यांच्या या आक्षेपार्ह पोस्टनंतर मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. या पोस्टमुळे एनएसयूआयने शिवम शुक्लाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

एनएसयूआयने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला
एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष दीपक मिश्रा यांनी शिवमविरोधात सिधी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय रुपयांची छेडछाड आणि गांधींचा खून करणाऱ्या गोडसेचा प्रचार करण्याच्या आरोपात फिर्याद नोंदवली आहे. दीपक मिश्रा यांनी तक्रारीत म्हटले आहे की, एबीव्हीपीचे सचिव म्हणून स्वत:चे वर्णन करणारे शिवम शुक्ला यांनी महात्मा गांधींचा सन्मान करणाऱ्यांना भडकावण्याचे काम केले आहे, अशा परिस्थितीत लॉकडाऊन दरम्यान दोन्ही पक्षांमध्ये वाद होऊ शकतो.