आठवड्याभराची झुंज अयशस्वी, भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे कोरोनामुळे निधन

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. कोरोना विषाणूने राजकीय नेते आणि मंत्र्यांना देखील आपल्या विळख्यात घेतले आहे. राज्यातील अनेक नेत्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. जळगावमध्ये भाजपचे माजी खासदार आणि भाजप ग्रामीण जळगाव अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

हरिभाऊ जावळे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं होत. जळगावमध्य त्यांची स्वॅबची चाचणी केली असता कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जावळे यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मागील सात दिवसांवर या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हरिभाऊ जावळे यांनी दोन वेळा जळगावमधून खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी दोन वळा त्यांनी विधानसभा निवडणूकही जिंकली होती. हरिभाऊ जावळे हे सध्या जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाचे काम पहात होते. हरिभाऊ जावळे यांच्या निधनामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह राजकारण आणि समाजात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.