केरळमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार; पीसी चाको यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश

नवी दिल्ली : केरळमधील ज्येष्ठ नेते पी. सी. चाको यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याचीच चर्चा सुरु होती. मात्र, त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. चाको यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे.

पी. सी. चाको यांच्या पक्षप्रवेशावेळी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, श्रीनिवास पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. चाको यांनी काँग्रेसमधून बाहेर पडताना विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसकडून उमेदवारी देताना मोठ्या प्रमाणात गटबाजी झाली, असा आरोप केला होता. त्यानंतर ते पक्षातून बाहेर पडले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांनी काँग्रेसवर टीका केली. ‘सध्या विरोधकांमध्ये एकजूट गरजेची आहे. पण मी यापूर्वी ज्या पक्षात होतो, त्या पक्षात हे पाहिले नाही’. असे ते म्हणाले.

दरम्यान, केरळच्या मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला. त्यावेळी त्यांनी चाको यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर डावे आनंदी असल्याचे म्हटल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तसेच चाको यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे मी समाधानी आणि आनंदी आहे, असेही पवार म्हणाले.

चाको यांच्या जाण्याने फरक पडणार नाही
पी. सी. चाको यांच्या काँग्रेसमधून जाण्याने फार काही फरक पडणार नसल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले आहे. त्यांच्याकडे जास्त जनाधार नाही. ते फक्त ख्रिश्चन समाजाच्या एका गटाचे नेतृ्त्व करतात, असे काँग्रेसने म्हटले होते.