क्रिकेट खेळता खेळता जुळली मनं ; ‘या’ २ महिला क्रिकेटपटूंनी बांधली लग्नगाठ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात आज एक महत्वपूर्ण घटना घडली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या दोन महिला खेळाडूंनी लग्नगाठ बांधली आहे. या क्रिकेटपटूंचे देश वेगळे असून त्यातील एक न्यूझीलँडची तर दुसरी ऑस्ट्रेलियाची आहे. विशेष म्हणजे या दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियात महिलांच्या बिग बॅश लीग स्पर्धेत एकमेकांच्या प्रतिस्पर्धी संघात खेळत होत्या.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या हेली जेन्सन आणि निकोला हॅनकॉक यांनी लग्न केले असून त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. हेली न्यूझीलँड क्रिकेट संघाची जलदगती गोलंदाज आहे. सात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि वीस टी-२० सामने खेळली आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या निकोला हॅनकॉकने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणच केलं नाही. निकोला ही सध्या मेलबर्न स्टार्ससाठी बिग बॅश लीगमध्ये क्रिकेट खेळते. ऑस्ट्रेलिया मेलबर्न स्टार्सने ट्विटर हँडलवरुन या दोघींना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दोन महिला क्रिकेटपटूंनी आपसात लग्न केल्याची पहिलीच घटना नाही. यापूर्वीही मागीलवर्षी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघातील डेन वॅन निकेर्क आणि मॅरीजाने कॅप या दोघींनी लग्न करून खळबळ माजवली होती.