‘लष्कराच्या शौर्याचा वापर राजकीय फायद्यासाठी नको’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लष्कराने किंवा जवानाने दाखवलेल्या शौर्याचा वापर जर कोणता राजकीय पक्ष निवडणुकीसाठी करत असेल तर त्या पक्षाला निवडणूक आयोगानेच रोखले पाहिजे अशी मागणी नौदलाचे माजी नौदल प्रमुख अॅडमिरल एल. रामदास यांनी केली आहे.  त्यासंबंधी त्यांनी एक पत्रच मुख्य निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. जवानांच्या शौर्याचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी केला जाऊ नये अशा आशयाचं पत्र रामदास यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे.
विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानात अडकल्यानंतर कोणत्याही चर्चेशिवाय भारताने पाकिस्तानातून विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करावी अशी मागणी भारताने केली होती. त्यानंतर पाकने विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केली होती. मात्र या मुद्द्यांचा राजकीय वापर केला जात आहे आणि हे साफ चुकीचे आहे. निवडणूक आयोगाने यावर बंदी घालावी अशी मागणी रामदास यांनी पत्राद्वारे केली आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. असे असताना काही ताज्या घटनांचा राजकीय पक्षांकडून मतदारांना प्रभावित करण्यासाठी गैरवापर होत कामा नये असे रामदास यांनी पत्रात म्हटले आहे. मुख्य म्हणजे, पराक्रम हा कोणत्याही धर्मासाठी नसून तो राष्ट्रासाठी असतो. महत्त्वाचे म्हणजे भारताच्या सुरक्षा दलांनी नेहमीच गौरवशाली कामगिरी केली आहे असेही रामदास यांनी म्हटले आहे.
आपल्या पत्रात रामदास पुढे म्हणाले की, ” जवानांच्या प्रतिमा राजकीय नेत्यांसोबत झळकवणे, लष्करी पोषाखाचा निवडणूक रॅलीत दुरुपयोग करणे हे प्रकार जवानांनी स्वीकारलेल्या मूल्यांना नष्ट करणारे आहेत” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.