काय सांगता ! होय, माजी पंतप्रधानांच्या मीडिया सल्लागारांसोबत झाली होती ऑनलाईन फसवणूक, 8 वी पास आरोपीला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली, ज्यामध्ये आवश्यक वस्तू सोडता सर्व काही बंद केले गेले आणि या काळात दारूची दुकानेही बंद ठेवण्यात आली. अशा परिस्थितीत सायबर गुन्हेगारांनी सोशल मीडियावर ऑनलाइन लीकर व वाईन शॉपच्या नावाने पेज तयार करून लोकांच्या पैशांवर हात साफ केलेत. अशा सायबर गुन्हेगाराचे बळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार राहिलेले संजय बारू देखील झाले.

लॉकडाऊन दरम्यान संजय बारू इंटरनेटवर ऑनलाइन मद्य दुकानाचा शोध घेत होते. गुगलवर सर्च करत असताना संजय यांना फेसबुकवर एक पेज मिळाले, ज्याचे नाव होते ला केव्ह वाईन शॉप (La Cave Wine shop). पेजवर लिहिलेल्या नंबरवर फोन करून संजय यांनी दारूची ऑनलाइन मागणी केली. ऑनलाईन दारू विक्रीचा दावा करणाऱ्यांनी ऑनलाईन पैसे देण्यास सांगितले. ऑनलाईन पेमेंट दरम्यान संजय यांच्या खात्यातून 24 हजार रुपये काढून घेण्यात आले आणि त्यानंतर सायबर गुन्हेगाराने फसवणूक केल्यावर त्याचा फोन बंद केला.

याबाबत संजय यांनी दिल्लीतील हौज खास पोलिस ठाण्यात तक्रार दिली. चौकशीत सायबर गुन्हेगाराने बनावट नावाच्या पत्त्यावर बँक खाते उघडल्याचे उघडकीस आले आहे. टेक्निकल टीममार्फत दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला. तपासात निष्पन्न झाले की हे सायबर गुन्हेगार भरतपूर येथील रहिवासी आहेत. फसवणूकीनंतर पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचू नयेत यासाठी त्यांनी सिमकार्ड आणि इतर राज्यांची बँक खाती वापरली. त्यांनी आसाम, महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानमधील अधिक सिमकार्ड आणि बँक खाती वापरली आहेत.

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने सखोल चौकशी केली असता, संजय यांच्याकडील फसवणूक केलेली रक्कम पंजाब नॅशनल बँकेत वर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. आकिब जावेद असे या खातेधारकाचे नाव असून पत्ता राजस्थानमधील भरतपूरचा होता. दिल्ली पोलिसांच्या पथकाने आकिबच्या भरतपूरच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली.

चौकशी दरम्यान, आकीबने सांगितले की तो आणि त्याचे साथीदार अन्य राज्यांच्या बनावट नावाच्या पत्त्यावर सिमकार्ड घेत असत आणि मग वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांना कॉल करायचे आणि त्यांना शिकार बनवायचे. हे लोक 5 ते 10 मिनिटांत दुसऱ्या राज्यातील 3 ते 4 बँक खात्यात किंवा मनी वॉलेट मध्ये पैसे ट्रान्सफर करत असत.

त्यानंतर ते पैसा त्या खात्यात ट्रान्सफर करायचे जे त्यांचे स्वत: चे खाते असायचे. पोलिस त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकणार नाहीत अशा नियोजनाने ते सर्व करत असत. आश्चर्याची बाब म्हणजे चुटकीसरशी शिक्षित लोकांची बँक खाती साफ करणारा सायबर क्रिमिनल आकीब जावेद हा स्वत: आठवी पास असून ओला कॅबमध्ये ड्रायव्हर आहे. त्वरित पैसे कमविण्याच्या उद्देशाने तो सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात आला आणि त्यानंतर त्याने फसवणूक करण्यास सुरवात केली.