माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रविवारी रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावरती कार्डिओ-थोरॅसिक वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली उपचार सुरु होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

रविवारी रात्री छातीत त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल केलं होत. परंतु आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली. “मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीबाबत मी चिंतीत आहे. ते लवकर बरे होतील अशी मी अपेक्षा करतो. संपूर्ण देश त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे,” असं त्यांनी म्हटलं.

“माजी पंतप्रधान मनमोहन सिंग एम्समध्ये दाखल झाले आहेत हे ऐकून मी चिंतीत झालो आहे. मात्र ते आयसीयूमध्ये नाहीत आणि त्यांची प्रकृती ठीक आहे हे ऐकून बरं वाटलं. लवकरच ते पूर्णपणे बरे होतील अशी प्रार्थना करतो,” असं ट्विट शशी थरूर यांनी केलं. याव्यतिरिक्त अनेक नेत्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यसाठी प्रार्थना केली. “मी सर्व भारतीयांसह मनमोहन सिंग यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करतो. तसंच त्यांना उत्तम आरोग्य लाभो,” अशा आशयाचं ट्विट कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केलं होत. तर दुसरीकडे राज्यातील शिवसेना नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.