प्रसिद्ध डान्सगुरू क्वीन हरीश यांचा अपघातात मृत्यू

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानच्या जैसलमेर येथील विख्यात नृत्यगुरू क्वीन हरीश यांचा आज (रविवार) भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला. क्वीन हरीश यांनी आत्तापर्यंत पाच हजार पेक्षा जास्त कलाकारांना राजस्थानी संगीत आणि भारतीय लोकनृत्याचे प्रशिक्षण दिले होते. हा अपघात जोथपूरच्या बिलाडाजवळ झाला. एका भरधाव ट्रकने हरीश यांच्या गाडीला जोराची टक्कर दिली. यामध्ये क्वीन हरीश यांच्यासह चार कलाकारांचा मृत्यू झाला.

क्वीन हरीश यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नृत्याने अनेक दिग्गजांची वाहवा मिळवली होती. आज एका कार्यक्रमासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घतला. त्यांच्या मृत्यूची बातमी जैसलमेरमध्ये समजता शहरात शोककळा पसरली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी क्वीन हरीश यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

आपल्या शोक संदेशात गहलोत यांनी म्हटले आहे की, जोधपुरमध्ये झालेल्या भीषण अपघातात क्वीन हरीश यांच्यासहित चार कलाकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. फक्त जैसलमेर नाही तर संपूर्ण राज्यासाठी ही दु:खद घटना आहे. क्वीन हरीश यांच्या जाण्याने कला क्षेत्राची खूप मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रीया गहलोत यांनी दिली आहे.