Pune : दौंड तालुक्यात पुराच्या पाण्यात 4 जण वाहून गेले, खानवटे गावावर शोककळा !

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी पावसानं हाहाकार माजवला. या मुसळधार पावसानं नदी, ओढे यांना पुराचं स्वरूप प्राप्त झालं होतं. जिल्हा प्रशासनाकडून नदी, ओढ्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पावसामुळं ओढ्याला आलेल्या पुरात 4 तरूण वाहून गेल्याची घटना दौंड तालुक्यातील राजेगाव येथे बुधवारी घडली. या वाहून गेलेल्यापैकी 3 जणांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध अद्यापही सुरू आहे. दुचाकीवरून जात असताना ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेगाव (ता दौंड) परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळं ओढ्याला आलेल्या पुरामुळं खानवटे (ता दौंड) येथील दुचाकीवरून जाणारे 4 नागरिक वाहून गेले. त्यातील 3 व्यक्तींचे मृतदेह सापडले असून मृतांमध्ये पती पत्नींचा समावेश आहे. दुपारपर्यंत एकाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

मृतांमध्ये शहाजी गंगाधर लोखंडे (वय 52), आप्पा हरिबा धायतोंडे (वय 55) आणि कलावती आप्पा धायतोंडे (वय 50) यांचा समावेश आहे. तर सुभाष नारायण लोंढे (वय 48) यांचं शोधकार्य सुरू आहे.

या दुर्दैवी घटनामुळं दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेवटच्या टोकाला असलेल्या खानवटे गावावर शोककळा पसरली आहे. घटना स्थळी तहसिलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी भेट दिली. गावकामगार तलाठी जयंत भोसले यांनी स्थानिक ग्रामस्थांना घेऊन शोधकार्य केलं.