शेतकरी आंदोलनाला चीन, पाकिस्तानमधून फंडिंग ! पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरांचे वादग्रस्त विधान

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) चीन (China) आणि पाकिस्तानमधून (Pakistan) फंडिंग (Funding) होते की काय असे वाटत आहे, असे वादग्रस्त वक्तव्य पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर आणि भाजप (BJP) नेते केशव घोळवे (Keshav Gholve) यांनी केले आहे.

उपमहापौर घोळवे हे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आणखीही वादग्रस्त विधान केले. या आंदोलनाला रोजंदारीने लोकं आणली जात आहेत, अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी ही वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली असून, महापालिकेतील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याशिवाय भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनीदेखील उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

केंद्रातील मोदी सरकारच्या कामगार कायद्याविरोधात विविध संघटनांनी 26 नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपावेळी आंदोलनात उतरून घोळवे यांनी सर्वांना धक्का दिला होता. केंद्राच्या कायद्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप असल्याचे सांगत त्यांनी आपल्याच सरकार विरोधात भूमिका घेतली होती. आता तेच केशव घोळवे शेतकरी आंदोलनाचा चीन आणि पाकिस्तानशी संबंध जोडून नव्या वादात सापडले आहेत.